Monday 23 January 2017

Salute to Indian Army


माझ्या शहिद जवानांना ही १ कविता अर्पण.....

बघ ना आई वेळ आज कशी वैरीन झालीय...
तुझी भेट न घेताच माझी जाण्याची वेळ आलीय...

घायाळ जरी झालो तरी 
अजूनसुद्धा लढतो आहे
आई...इंच इंच जखमा छातीवर घेऊन
पत्र शेवटचं लिहतो आहे,
पत्र शेवटचं लिहतो आहे...

लहानपणीच्या सर्वच गोष्टी आई
जशाच्या तश्या आठवतात
या बर्फ़ावरती माझ्या डोळ्यातली
आसवंसुद्धा गोठवतात
खुपदा वाटतं आई तुझ्या
कुशीत येऊन निजावं
तुझ्या प्रेमाच्या वर्षावात
पुन्हा एकदा भिजावं
पण मला ठाऊक आहे,
असं आता होणार नाही
आली वेळ मला सोडून,
रित्या हाती जाणार नाही
आपलं घर आठवून आई,
एकटाच रडतो आहे
रडता, रडता आई पत्र शेवटचं लिहतो आहे...

तुमच्यासाठी बाबा...
बरंच काही करायचं होतं
तुमच्या खांद्यावरच ओझं थोडं
माझ्या खांद्यावर घ्यायचं होतं
पहा ना बाबा !
दैवानं आपला कसा घात केला
माझ्या प्रेताचा भार सुद्धा
तुमच्याच खांद्यावरती दिला
तुमच्यासाठी काही करू शकलो नाही म्हणून...
मारणाआधीच मारतो आहे
मरता... मारता बाबा पत्र शेवटचं लिहतो आहे..

तुझ्या सगळ्या आठवणी भैय्या
मनात घर करून बसल्या आहेत
आत्ताच... चार दोन गोळ्या
उजव्या दंडात घुसल्या आहेत
उजव्या दंडात गोळी घुसताच
तुझी आठवण हेलावून गेली
मी तुझा उजवा हात आहे
असं म्हणायची वेळही आता सरून गेली
आपल्या छोट्या छकुलीची
काळजी तू घेत जा
माझ्या वाटणीची राखिसुद्धा
तूच आता बांधत जा...
आपल्या तिघांचा लहानपणीचा फोटो पाहून
एकटाच झुरतो आहे
झुरता, झुरता भैय्या पत्र शेवटचं लिहतो आहे...

रक्षाबंधनाला बांधलेला राखीचा धागा
छकुली अजून हातात आहे
यावेळची ओवाळणीही दिली नव्हती
हे ही माझ्या ध्यानात आहे
तूच सांग छकुली आता
तुला ओवाळणी काय देऊ
इथून निघून गेल्यावरती
रक्षाबंधनाला कसा येऊ
ज्या हातात राखीचा धागा आहे
त्याच हाताने लिहतो आहे
तुला आठवता आठवता
छकुली पत्र शेवटचं लिहतो आहे...

माझ्यामुळे सखे तुझं
आयुष्यच आता विराण होणार आहे
माझ्यासोबत मी तुझं
सर्वस्वच नेणार आहे
आपल्या दोन चिमण्यांना
माझा शेवटचा पापा दे
त्यांच्या डोक्यावर तुझा हात ठेवून
माझा शेवटचा आशीर्वाद दे
बघ ना सखे वेळ कशी
सर्रर्रर्...कण निघून जात आहे
काळोख माझ्या डोळ्यासमोर
थैमान घालत आहे...

आई...आई...आई ...
पुन्हा चार दोन गोळ्या
काळजामध्ये लागल्या आहेत
तश्या तुझ्या सगळ्याच आठवणी
पुन्हा मनामध्ये जागल्या आहेत
माझ्या डोळ्यासमोर आई
काळोख दाटून येतो आहे
ईच्छा नसतानाही
तुझा शेवटचा निरोप घेतो आहे

आई जमलंच तर पुन्हा मी
जीवन होऊन येणार आहे
अन त्यावेळीसुद्धा फक्त
तुझ्याच उदरी
जन्म घेणार आहे
आई तू रडू नकोस,
तुझ्या उसाश्याचा आवाज कानी येतो आहे
आवाज ऐकता, ऐकता... लढता , लढता... झुरता, झुरता... मरता, मरता पत्र शेवटचं लिहतो आहे
पत्र शेवटचं लिहतो आहे.
                                                          -  ARMY

No comments:

Post a Comment